साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर नरेंद्र मोदींनी हुंकार रॅलीला संबोधित केले. मोदींच्या सोबत यावेळी मंचावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह, अरुण जेटली, शत्रुघ्न सिन्हा, सुशीलकुमार मोदी उपस्थित आहेत.  यदूवंशीयांसाठी मी द्वारकेवरून आशीर्वाद घेऊन आलो आहे. बिहारी लोकांची चिंता वाहण्याची जबाबदारी मी घेतो, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. बिहारी लोक अतिरेकी नाहीत, मात्र काही अपवाद वगळता अशा शब्दांत आजच्या स्फोटांच्या संदर्भाने मोदी यांनी टिप्पणी केली.
पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार यांनी काँग्रेससोबत हात मिळवणी केली आहे. त्यांनी केवळ आमचा नाही तर बिहारच्या कोट्यवधी जनतेचा विश्वासघात केला आहे. अशा विश्वासघात करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार का? असा प्रश्न मोदींनी यावेळी जमावाला विचारला. पुढे ते म्हणाले की, नितीशकुमारांच्या सरकारमध्ये युतीत भाजप मंत्र्यांनीच बिहारमध्ये काम केले आहे.
काँग्रेसमुळे देशात गरिबी वाढली आहे. राहुल गांधी यांना निशाणा साधत मोदी म्हणाले की, काँग्रेसला शहजादे म्हटले तर राग येतो. तसेच, देशालाही वंशवादी राजकारणाचा राग येतो. त्यांनी वंशवाद सोडला तर, मी शहजादे म्हणणे सोडेन. परिवारवाद, जातीयवाद, वंशवाद हा लोकशाहीला कलंक आहे. तसेच, काँग्रसेने २००४ सालापूर्वी केलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नाहीत. शेतकरी किंवा गरीब लोकांबद्दल  त्यांना अजिबात चिंता नाही, असेही मोदी म्हणाले.
बिहारच्या जनतेचा विकास घडवणे हेच भाजपचे लक्ष्य असून सध्या राज्यात असलेले जेडीयू सरकार येथील जनतेने उखडून टाकावे आणि भाजपच्या हाती सत्ता द्यावी, असे आवाहन देखील मोदी यांनी यावेळी केले.