कायदा म्हणजे काय असतो? कायद्याची अमलबजावणी ज्यावेळी होते तेव्हा सगळ्यांना माघार घ्यावी लागते. याचीच प्रचिती देणारी घटना घडली आहे सिक्कीममध्ये. लॉकडाउन असल्यानं सगळीकडं बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशात राज्याची सीमा ओलांडून बाहेर जाणाऱ्या एका न्यायमूर्तींच्या कारलाही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यामुळे राज्याच्या सीमेवरून पुन्हा माघारी जावं लागलं.

न्यायमूर्ती भास्कर प्रधान यांनी आपली कार्यालयीन गाडी आपल्या कुटुंबाला सिलगुडीवरून गंगटोकला आणण्यासाठी पाठवली होती. यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून लॉकडाउनच्या काळात प्रवास करण्यासाठी लागणारा पासही घेतला होता. जेव्हा न्यायमूर्ती प्रधान यांचा चालक कार घेऊन राज्याच्या सीमेवर पोहोचला, तेव्हा तेथे असलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी न्यायमूर्तींची कार रोखली.

चालकानं गाडी थांबवल्यानंतर अधिकाऱ्यांने चौकशी केली. आपण न्यायमूर्ती प्रधान यांच्या कुटुंबाला परत आणण्यासाठी जात असल्याचं कारचालकाने उपविभागीय अधिकारी प्रेम कमल राय यांना सांगितलं. हे ऐकल्यानंतर राय यांनी कारचालकाला माघारी जाण्यास सांगतिले. त्यानंतर चालकाने न्यायमूर्ती प्रधान यांना फोन केला. त्यावर न्यायमूर्तींनीही अधिकाऱ्याला सहकार्य करण्यास सांगत माघारी बोलावलं. ‘फ्री प्रेस जर्नल’नं या घटनेचं वृत्त दिलं आहे.

यासंदर्भात फ्री प्रेस जर्नलशी बोलताना राय म्हणाले,’रंगपो चेकपोस्टवर कर्तव्यावर असताना न्यायमूर्तींची कार आली. त्यावेळी कारचालकाची चौकशी केली. त्यावेळी आपण न्यायमूर्तींच्या कुटुंबांना परत आणण्यासाठी जात असल्याचं त्यानं सांगितलं. सिक्कीमची सीमा ओलांडण्याची एकाही वाहनाला परवानगी नाही. त्यामुळे परत जावं, असं चालकाला सांगितलं. त्यानंतर चालकानं न्यायमूर्तींना याविषयी फोन करून सांगितलं. त्यांनीही कारचालकाला परत येण्यास सांगितलं.