अफजल गुरुच्या फाशीविरोधात पाकिस्तानमधील संसदेने मंजूर केलेल्या ठरावाचा भारतीय संसदेने आज एकमताने निषेध केला. भारताच्या अंतर्गत विषयात पाकिस्तानने लक्ष घालू नये आणि दहशतवाद्यांना अभय देण्याचे काम करू नये, असेही संसदेने पाकिस्तानला ठणकावून सांगितले.
लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पाकिस्तानच्या कृतीचा निषेध करणारा ठराव शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आला. लोकसभेमध्ये अध्यक्षा मीराकुमार यांनी ठरावाचे वाचन केले. पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्य भारताचा अविभाज्य घटक आहे आणि राहील, असेही या ठरावात नमूद करण्यात आले आहे. भारताच्या अंतर्गत विषयामध्ये कुरघोडी करण्याच्या प्रत्येक कृतीचा आम्ही एकजुटीने विरोध करू. पाकिस्तानी संसदेने १४ मार्च २०१३ रोजी मंजूर केलेला ठराव हे सभागृह संपूर्णपणे फेटाळत असल्याचे या ठरावात स्पष्ट करण्यात आले. मीराकुमार ठरावाचे वाचन करीत असताना सर्व सदस्यांनी बाके वाजवून त्याचे स्वागत केले. राज्यसभेमध्येही हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
अफजल गुरुला दिलेल्या फाशीचा निषेध करणारा ठराव पाकिस्तानी संसदेने मंजूर केला. अफजलचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे परत देण्यात यावा, अशीही मागणी या ठरावात करण्यात आली. त्यावर विरोधी पक्षांनी शुक्रवारी तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर पाकिस्तानच्या कृतीचा निषेध करणारा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात आला.