सुप्रसिद्ध नृत्यांगणा सपना चौधरीने काँग्रेस प्रवेश केला की नाही यावरुन आज (रविवार) दिवसभर राजकीय वातावरण तापलेले दिसले. एकीकडे पत्रकार परिषद घेऊन सपना चौधरी यांनी आपण काँग्रेसमध्ये सहभागी झाले नसल्याचे जाहीर केले. तर दुसरीकडे काँग्रेसने सपना चौधरीच्या काँग्रेस सदस्यत्वाचा अर्ज, सदस्यत्व शुल्काची पावती आणि सदस्यत्वाचा अर्ज भरतानाचा फोटोच प्रसिद्ध केला आहे.

सपना चौधरी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्या मथुरा मतदारसंघातून भाजपाच्या विद्यमान खासदार हेमामालिनी यांच्याविरोधात उभे राहणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. सपना चौधरी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे एकत्रित छायाचित्रही प्रसिद्ध झाले होते. यावर खुलासा करताना सपना चौधरी यांनी आज पत्रकार परिषद बोलावून काँग्रेसमध्ये सहभागी झाले नसल्याचे स्पष्ट केले. मी काँग्रेसमध्ये सहभागी झालेली नाही आणि भविष्यातही कोणत्याही पक्षात जाण्याचे नियोजन नसल्याचे त्यांनी म्हटले.

प्रियंका गांधी यांच्याबरोबर छायाचित्र जुने असल्याचे सपना चौधरी यांनी सांगितले. मी कोणत्याही पक्षात सहभागी झालेली नाही. तसेच कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही. जर कोणत्या पक्षात सहभागी होणार असेल तर सर्वांत आधी माध्यमांना सांगेन, असेही सपना चौधरी यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, उत्तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नरेंद्र राठी यांनी सपना चौधरी यांनी काँग्रेस सदस्यत्व स्वीकारल्याचा पुरावाच सादर केला. त्यांनी सपना चौधरी यांचा सदस्यत्व स्वीकारल्याचा अर्ज दाखवून त्यावरील त्यांची स्वाक्षरीही दाखवली. त्याचबरोबर अर्ज भरतानाचा सपना चौधरी यांचे छायाचित्रही त्यांनी सादर केले. या प्रकारामुळे आता गुंतागुंत आणखी वाढली आहे.