मध्य प्रदेशातील मंदसौर येथील शेतकरी आंदोलनाची धग अद्याप शांत झालेली दिसत नाही. मंदसौर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेला पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याला पोलिसांनी रस्त्यातच रोखले. त्याला निमच येथील नायगाव येथे ताब्यात घेतलं. पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यानंतर हार्दिकनं पोलीस प्रशासन आणि भाजप सरकारवर टीका केली आहे. मी भारतीय असून, मला देशात कुठेही जाण्याचा अधिकार आहे. मी दहशतवादी नाही किंवा मी पाकिस्तानमधील लाहोरमधून आलो नाही, असं पटेल म्हणाला.

मध्य प्रदेशात मंदसौरमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात ६ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हेही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मंदसौर येथे जात होते. त्याचवेळी त्यांना पोलिसांनी रोखले होते. आज पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलही मंदसौर येथे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात होता. त्याला निमच येथील नायगाव येथे पोलिसांनी रोखले. त्याच्यासोबत संयुक्त जनता दलाचे नेते अखिलेश कटियार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी हार्दिक पटेल याला अटक केली आहे. पटेलसह आणखी एका नेत्याला ताब्यात घेण्यात आले होते. दोन्ही नेत्यांची जामिनावर सुटका करण्यात आली असून, पोलिसांच्या वाहनाने त्यांना राज्याबाहेर सोडण्यात आले आहे, अशी माहिती शहर पोलीस अधीक्षक अभिषेक दिवाण यांनी दिली. सुटकेनंतर पटेल याने पोलिसांवर निशाणा साधला आहे. मी दहशतवादी नाही आणि लाहोरहून आलो नाही. मी भारतीय नागरिक असून देशात कुठेही फिरण्याचा मला अधिकार आहे, असं पटेल म्हणाला. भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीवरही त्याने तोफ डागली. देशातील ५० कोटी शेतकरी सत्ताधारी भाजपविरोधात आहेत, असे पटेल याने सांगितले.

शेतमालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मंदसौरमध्ये या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. त्याचवेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ६ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी भाजप सरकारवर टीका केली होती. गेल्या आठवड्यात मंदसौर येथील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही ताब्यात घेतलं होतं. तर शनिवारी राज्यात शांतता नांदावी, यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे उपोषणाला बसले होते.