दलित मुलाशी विवाह नामंजूर असल्याने वडिलांनीच आपल्या २१ वर्षांच्या मुलीला चाकूने भोसकून ठार केले आहे. गुरुवारी ही धक्कादायक घटना केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यात घडली आहे. शुक्रवारी म्हणजेच आज ही २१ वर्षांची मुलगी तिच्या प्रियकराशी लग्न करणार होती. पण त्याआधीच तिला तिच्या वडिलांनी भोसकून ठार केले आहे. अथिरा असे या मुलीचे नाव आहे. तर ब्रिजेश असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. या दोघांच्या लग्नाला या दोघांच्याही कुटुंबीयांनी विरोध होता.

या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झालेले दोघांच्याही कुटुंबीयांना समजले होते. या दोघांनी एकमेकांमध्ये प्रेमसंबंध ठेवू नयेत अशी दोन्ही कुटुंबीयांची इच्छा होती. मात्र या दोघांनीही विरोध झुगारून विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. या दोघांच्या लग्नाच्या आधीच अथीराच्या वडिलांनी तिला भोसकून ठार केले.

अथिरा एझावा जातीची होती. तिने दलित तरूण असलेल्या ब्रिजेशशी लग्न करू नये यामुळेच तिच्या वडिलांनी तिला चाकूने भोसकले. वडिलांनी तिच्यावर केलेला वार इतका जबरदस्त होता की त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. अथिरा आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये तिच्या लग्नावरून सातत्याने वादावादी होत होती. तिने लग्नाची तयारी सुरू केल्यामुळे तिच्या वडिलांचा आणि तिचा पुन्हा वाद सुरु झाला. या वादात रागाचा पारा अनावर झाल्याने वडिलांनी धारदार चाकूने तिच्यावर वार केला ज्यात तिचा मृत्यू झाला.

अथिरा केरळच्या मंजिरी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करत होती. तिच्यावर वार केल्यावर तिच्या वडिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. जातीपातीच्या खोट्या प्रतिष्ठेमुळे एका निष्पाप मुलीला तिचा जीव गमवावा लागला.

भारतात २०१५ या वर्षात ऑनर किलिंग्जची २५१ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. खोट्या प्रतिष्ठेला महत्त्व देऊन आपल्या जन्म दिलेल्या मुलीला ठार कसे केले जाऊ शकते? हा प्रश्न अशी कृती करण्यापूर्वी प्रत्येक बापाने स्वतःला विचारावा अशी माफक अपेक्षा समाजातून केली जाते आहे. तसेच प्रेम विवाहाला विरोध का करता असाही प्रश्न विचारला जातोय आहे.