भगव्या वस्त्रांमुळे गैरसमज पसरवले जात असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ‘राज्यात सुखसमृद्धी आणून राज्यातील सर्व घटकांची मने जिंकून घेऊ,’ असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ‘मी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली देशाच्या परंपरांचा अपमान करणाऱ्यांना भीती वाटू लागली आहे,’ असे आदित्यनाथ म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर साप्ताहिकाला आदित्यनाथ यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील अनेक मुद्यांवर भाष्य केले.

‘भगव्या पेहरावामुळे माझ्याविषयी अनेक गैरसमज पसरवण्यात आले आहे. मी भगवी वस्त्रे घालतो, असे अनेकजण म्हणतात. देशातील अनेकांना भगव्या रंगाची अॅलर्जी आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली देशातील प्रथा आणि पंरपरांचा अपमान करणाऱ्यांच्या मनात मी उत्तर प्रदेशचे नेतृत्व स्वीकारल्यापासून भितीची भावना निर्माण झाली आहे,’ असेही आदित्यनाथ म्हणाले.

‘आमच्या कार्यपद्धतीतून आम्ही राज्यातील सर्व घटकांची मने जिंकून घेऊ. आम्ही राज्यात सुख आणि समृद्धी आणू. आम्ही केवळ पदे भूषवण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. राष्ट्राचे रक्षण करणे हा माझ्या सरकारचा धर्म असेल. उत्तर प्रदेशात भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देऊन राज्यातील गुंडाराज संपुष्टात आणू. राज्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचे परिणाम काही महिन्यांमध्येच दिसतील,’ असे आदित्यनाथ ऑर्गनायजरला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

‘उत्तर प्रदेशातील स्थलांतर रोखण्यासाठी नवे औद्योगिक धोरण राबवण्यात येईल. या नव्या धोरणांतर्गत ९० टक्के रोजगार स्थानिकांना देण्यात येईल. उत्तर प्रदेशातील औद्योगिक क्षेत्रात भूमीपूत्रांना प्राधान्य दिले जाईल,’ असे आदित्यनाथ यांनी सांगितले. ‘साखर कारखान्यांचे थकलेले पैस येत्या १४ दिवसांमध्ये दिले जातील. यासोबतच येत्या सहा महिन्यांमध्ये पाच ते सहा नवे साखर कारखाने सुरु करण्यात येतील,’ असेही आदित्यनाथ यांनी सांगितले.