पाकिस्तानात वीजटंचाई भीषण रूप धारण करीत असून काल मध्यरात्री संपूर्ण देशातच वीजपुरवठा खंडित झाला. नेमका काय बिघाड होता हे समजू शकले नाही, पण ८० टक्के देश अंधारात बुडाला होता. गेल्या एक महिन्यात चार वेळा वीजपुरवठय़ात खंड पडण्याचे प्रकार झाले आहेत. वीज खंडित होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत.
जल व वीज मंत्रालयाने सांगितले की, गुड्डू ऊर्जा प्रकल्पातील पारेषण लाइन ट्रिप झाल्याने वीज गेली. कारण त्यामुळे जमशोरो व बिन कासिम वीज प्रकल्प बंद पडले.
पाणी व वीज उपमंत्री शेर अली यांनी सांगितले की, बलुचिस्तानातील नसीराबाद जिल्ह्य़ात अतिरेक्यांनी पारेषण तारा उडवल्याने वीज खंडित झाली. अधिकारी आता वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत असून, हळूहळू वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. देशात दोन आठवडय़ांपासून पेट्रोलचा पुरवठा  सुरळीत नाही. त्यानंतर आता वीज संकट उभे ठाकले आहे, त्यामुळे पंतप्रधान नवाझ शरीफ आणखी अडचणीत आले आहेत.