इटलीच्या पंतप्रधानपदाची सूत्रे लवकरच मॅट्टेओ रेन्झी यांच्या हातात पडणार आहेत. युरोपियन संघातील सर्वात तरुण पंतप्रधान होणाऱ्या रेन्झी यांचे नाव सोमवारी जाहीर करण्यात आले आहे.  मोठय़ा प्रमाणात सुधारणा घडवून आणण्याबरोबरच ‘युरोझोन’मधील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे आश्वासन रेन्झी यांनी आपल्या देशवासीयांना दिले आहे. राष्ट्रपती जॉर्जियो नापोलिताने यांच्याकडून रेन्झी यांच्या उमेदवारीला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. रेन्झी यांच्या निवडीचे देशातील गुंतवणूकदारांनीही स्वागत केले आहे.
फ्लोरेन्सचे महापौर असणाऱ्या ३९ वर्षीय रेन्झी यांनी सर्वात प्रथम बेरोजगारी दूर करण्याबरोबरच आर्थिक वृद्धीला चालना देण्याचे आश्वासन इटलीच्या जनतेला दिले आहे. डाव्या लोकशाही पक्षाचे प्रमुख असणाऱ्या रेन्झी यांनी आपल्याच पक्षाच्या एन्रिको लेट्टा यांचे स्थान मिळवले आहे. लेट्टा हे इटलीच्या विकासाला हातभार लावण्यात अपयशी ठरल्याचा आरोप रेन्झी यांनी केला आहे. आगामी २०१८च्या निवडणुकीपर्यंत देशात स्थिर सरकार देण्याबरोबरच आर्थिक विकासाला चालना देऊन बेरोजगारी कमी करण्यास सर्वाधिक प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन रेन्झी यांनी देशाच्या जनतेला दिले आहे.