अरुणाचल प्रदेशमध्ये शनिवारी एकही वृत्तपत्र प्रकाशित झाले नाही. इटानगरमधील पोलीस संकुलासमोर ‘स्टुडंट युनियन मूव्हमेंट ऑफ अरुणाचल’ (एसयूएमए) या संघटनेला धरणे धरण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने त्याच्या निषेधार्थ सर्व वृत्तपत्र कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. या आगळ्यावेगळ्या निषेधाच्या पद्धतीमुळे अरुणाचल प्रदेशच्या रहिवाशांना शनिवारी एकही वृत्तपत्र वाचायला मिळाले नाही.
इटानगरच्या उपायुक्त मिगे काम्की यांनी एसयूएएमच्या कार्यकर्त्यांना धरणे धरण्यास परवानगी दिल्याने काम्की यांना निलंबित करावे, अशी मागणी तेथील पत्रकार संघटनांनी केली आहे. अशा प्रकारचे धरणे जनताविरोधी असून, तथ्यहीन आहे, असे पत्रकार संघटनांचे म्हणणे आहे. एसयूएमएच्या या संघटनेने पोलीस संकुलात पत्रकारांना येण्यास मनाई केली होती. त्याशिवाय पत्रकारांना गैरप्रकारे वागणूक दिली होती, असा आरोपही करण्यात आलेला आहे. ही संघटना प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे या संघटनेवर बंदी आणावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून करण्यात आली.