भोपाळ : करोना संसर्गातून बऱ्या होणाऱ्या काही रुग्णांना होणाऱ्या ‘म्युकरमायकॉसिस’ या रोगाबाबत मध्य प्रदेशचे सरकारी डॉक्टर अमेरिकी डॉक्टरांचा सल्ला घेणार आहेत, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास कैलास सारंग यांनी दिली. म्युकरमायकॉसिसच्या काही रुग्णांमध्ये काळ्या रंगाच्या बुरशीचा संसर्ग होतो आणि तो गंभीर स्वरूपाचा असतो. त्या बुरशीचा परिणाम झालेला भाग शस्त्रक्रियेने काढून टाकावा लागतो, असे सारंग यांनी स्पष्ट केले.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते म्युकरमायकॉसिसमध्ये डोकेदुखी, ताप ही लक्षणे दिसतात. डोळे व नाकावरही त्याचा परिणाम होतो तसेच दृष्टी जाण्याचा धोका असतो. महाराष्ट्र व गुजरात या राज्यातही म्युकरमायकॉसिसचे रुग्ण सापडले आहेत. सारंग यांनी म्हटले आहे की, भोपाळमधील हमिदिया रुग्णालयाचे डॉक्टर दूरसंवादाच्या माध्यमातून अमेरिकेतील डॉक्टरांशी चर्चा करणार आहेत.