मुले पळविणारी असल्याचा संशय

सिंगरौली : मुले पळविणारी असल्याच्या संशयातून जमावाने एका महिलेला केलेल्या बेदम मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे दिसत होते, मोरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोश गावात १९ जुलै रोजी जमावाकडून तिची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही महिला २५ ते ३० वर्षे वयोगटातील असल्याचे स्पष्ट होत असून अद्याप तिची ओळख पटलेली नाही. सिंगरौली जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा व्हॉट्सअ‍ॅपवरून गेला महिनाभर पसरवली जात होती. या प्रकरणी रविवारी १२ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने त्यांची रवानगी कारागृहात केली आहे.

काही जणांनी या महिलेला गावात फिरताना पाहिले, त्यानंतर त्यांनी महिलेला हटकले आणि मुले पळविणारी महिला असल्याच्या संशयावरून तिच्यावर लाठय़ांनी आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यानंतर तिचा मृतदेह जवळच्या गटारामध्ये टाकून दिला, असे पोलिसांनी सांगितले.