स्वित्झर्लंडमध्ये कार अपघात झाला असून यामध्ये झालेल्या नुकसानाचा आकडा ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या अपघातात मर्सिडीज, बुगाटी आणि पोर्शे कारचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोथार्ड पास येथे एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला. अपघातात तब्बल चार मिलियन डॉलर्सचं म्हणजेच जवळपास ३० कोटींचं नुकसान झालं आहे. डेली मेलने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

अपघातात मर्सिडीज, बुगाटी आणि पोर्शे या तिन्ही गाड्याचं नुकसान झालं आहे. वृत्तानुसार, ओव्हरटेक करत असताना गाड्यांनी एकमेकांना धडक दिली. बुगाटी आणि पोर्शे यांनी एकाच वेळी मर्सिडीजला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात त्यांनी एकमेकांना धडक दिली आणि हा अपघात झाला. यानंतर बुगाटीने मर्सिडीजला ठोकलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघात चार मिलियन डॉलर्सचं नुकसान झालं आहे. बचावकार्यासाठी पोलिसांनी रस्ता तात्पुरता बंद केला होता. अपघातात पोर्शेचं सर्वात जास्त नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.