समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात केलेल्या मोफत लॅपटॉप वाटप योजनेने मायक्रोसॉफ्ट कंपनीचे लक्ष वेधले आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकांचे लक्ष वेधणा-या या योजनेचे जगातील सर्वांत मोठी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट सखोल अभ्यास करणार आहे. या अभ्यासाचे नियोजन, अंमलबजावणी आणि लाभार्थी प्रतिसादावर अहवाल तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट इंडियन मार्केट रिसर्च ब्यूरोची (आयएमआरबी) मदत घेणार आहे. आयएमआरबीची एक टीम इलेक्ट्रॉनिक विभाग, माध्यमिक शिक्षण व लॅपटॉप वितरण करणारी कंपनी यूपी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांची सोमवारी भेट घेणार आहे. याचबरोबर लॅपटॉप वितरित करण्यात आलेल्या मुलांकडून त्यांची प्रतिक्रियाही घेणार आहेत. शनिवारी आयएमआरबीच्या लखनौ कार्यालयाच्या प्रतिनिधींनी यूपी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनच्या कार्यालयाला भेट देऊन लखनौ व वाराणसी येथील लाभार्थ्याची माहिती घेतली.
राज्य शासनाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॅपटॉप आणि त्याचे वितरण करण्यासाठी मदत करणा-या जिल्हा प्रशासनासही या टीमला भेटता येईल.