बांगलादेशी ब्लॉगर नीलय चक्रवर्ती नील (वय ४०) याच्या हत्येप्रकरणी चार संशयित इस्लामी दहशतवाद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही हल्लेखोर त्याच्या सदनिकेत शिरले व त्यांनी त्याला ठार केले. त्याचे टोपण नाव नीलय नील असे होते. ढाक्यातील एका वसाहतीत तो पाचव्या मजल्यावरील सदनिकेत कुटुंबासह राहात होता.
नीलची पत्नी आशा मोनी हिने खिलगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक झहीद उर रहमान यांनी सांगितले, की या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. अल काईदाचा बांगलादेशातील प्रमुख अन्सार अल इस्लाम याने नीलय याला ठार केल्याची जबाबदारी घेतली असून तो अल्लाचा शत्रू होता असे म्हटले आहे. नीलय याला अलीकडे धमक्या आल्या होत्या. त्याचे लेखन हे मूलतत्त्ववादाच्या विरोधात होते. नील याने गणजागरण मंच सुरू केला होता व तो १९७१च्या युद्ध गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रचार करीत होता. शुक्रवारच्या नमाजानंतर नीलचा झालेला खून हा नियोजित होता असे पोलिसांनी सांगितले असून, हा बांगलादेशातील चौथ्या ब्लॉगरचा खून आहे. अनंता बिजॉय दास याचा सिल्हेट येथे खून करण्यात आला. जन्माने अमेरिकी असलेल्या अविजित रॉय याचा फेब्रुवारीत खून झाला होता. त्याची पत्नी मात्र हल्ल्यात वाचली होती. अमेरिका व आंतरराष्ट्रीय समुदायाने या खुनाचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधी डेव्हिड काय व ख्रिस्तॉफ हेन्स यांनी या ब्लॉगर्सच्या खुनांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.