लष्कराची मागणी

ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डकडून (ओएफबी) लष्कराला पुरविण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या दारूगोळ्यामुळे तोफखाना, रणगाडे यांच्या अपघातांचे प्रमाण वाढत असून या प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी लष्कराने संरक्षण मंत्रालयाकडे केली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

संरक्षण उत्पादन सचिव अजयकुमार यांच्यासमोरही सदर  प्रश्न उपस्थित करण्यात आला असून निकृष्ट दर्जाच्या दारूगोळ्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वाच्या शस्त्रांचे नुकसान झाले आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

लष्कराने विनंती केल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने या प्रश्नामध्ये लक्ष घातले असता ओएफबी दारूगोळ्याच्या दर्जामध्ये सुधारणा करण्याबाबत सक्रिय नसल्याचे आढळले, असे सूत्रांनी सांगितले. देशामध्ये ४१ ऑर्डिनन्स कारखाने असून त्यांचा कारभार संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाखाली चालतो.

तथापि, दारूगोळ्याची तपासणी करून पूर्ण खात्री केल्याविना आम्ही तो जवानांच्या हातात देतच नाही, अशी भूमिका ओएफबीने घेतली आहे. प्रयोगशाळेमध्ये सर्व साहित्याची चाचणी घेण्यात येते आणि जवानांना त्याचा पुरवठा करण्यापूर्वीही विशिष्ट चाचण्या केल्या जातात, असेही ओएफबीचे म्हणणे आहे.

टी-७२ आणि टी-९० बंदुका, १०५ एमएम इंडियन फील्ड गन्स, १०५ एमएम लाइट फील्ड गन्स, १३० एमएम एमए१ मध्यम बंदुका आणि ४० एमएम एल-७० यांचे निकृष्ट दारूगोळ्यामुळे अपघात झाल्याचा अहवाल लष्कराने मंत्रालयास सादर केला आहे. निकृष्ट दारूगोळ्यामुळे लष्करातील अनेक जवान जखमी झाल्याची उदाहरणेही अहवालामध्ये देण्यात आली आहे.

लष्कराच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत गंभीर प्रश्न असून दलांना पुरविण्यात येणाऱ्या दारूगोळ्याचा दर्जा सुधारण्यासाठी मंत्रालयाने योग्य पुढाकार घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.