देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून निवडणुकीत कोण बाजी मारणार, यावर चर्चा रंगल्या आहेत. ‘मार्केट गुरू’ राकेश झुनझुनवाला यांनी देखील निवडणुकीसंदर्भात अंदाज वर्तवला आहे. ‘आगामी निवडणुकीतही देशात पुन्हा नरेंद्र मोदीच सत्तेवर येतील आणि यंदाच्या निवडणुकीत भाजपाला मिळणाऱ्या जागांचा आकडा हा सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरेल’, असे राकेश झुनझुनवाला यांनी म्हटले आहे.
गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला हे बुधवारी टायकॉन परिषदेत सहभागी झाले होते. दलाल स्ट्रीटवरचे ‘वॉरेन बफेट’ म्हणून त्यांना ओळखले जाते. झुनझुनवाला म्हणाले, भाजपा आगामी निवडणुकीत सर्वांना आश्चर्याचा धक्का देईल. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदीच विजयी होतील, असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यानंतर प्रत्येक दशकात भारताचा विकास दर उंचावला. व्यवस्थेत जेव्हा उलथापालथ होते तेव्हाच विकास आणि समृद्धी होते, भारत आणि अमेरिकेत असंच झाले होते, असे त्यांनी सांगितले. भारताच्या विकासात लोकशाही, उद्यमशीलता आणि नैसर्गिक संपत्ती याचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
झुनझुनवाला यांनी यापूर्वी डिसेंबरमध्येही तीन राज्यांमधील पराभवानंतरही भाजपाची पाठराखण केली होती.’विधानसभा निवडणुकांमधील हे निकाल भाजपासाठी इतकेही वाईट नव्हते, हे निकाल म्हणजे भाजपासाठी धक्का नाही उलट चांगले आहेत. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबाबत भविष्यवाणी करणं कठीण आहे, मात्र मी अजुनही माझे पैसे मोदींच्या सत्तेत परतण्यावरच लावणार’, असे त्यांनी सांगितले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 10:23 am