जगातील सर्वात उंच शिखर अशी ओळख असलेल्या माऊंट एव्हरेस्टची नवी उंची मंगळवारी नेपाळकडून जाहीर करण्यात आली. एव्हरेस्टची नवी उंची ही ८,८४८.८६ मीटर असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी दिली. माऊंट एव्हरेस्टची उंची ही आधीपेक्षा ०.८६ सेंटीमीटर एवढी वाढली असल्याचीही माहिती ग्यावली यांनी दिली. जवळपास वर्षभर या शिखराची उंचीच्या मोजमापावर काम सुरू होते. त्यानंतर अखेर मंगळवारी नेपाळकडून एव्हरेस्टची नवी उंची अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
8848.86 metres is the newly-measured height of Mount Everest, Nepal’s Foreign Minister announces. pic.twitter.com/Fnxh1liY98
— ANI (@ANI) December 8, 2020
२०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामध्ये एव्हरेस्टचा काही भाग खचला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानंतर नेपाळ सरकारने ही उंची पुन्हा एकदा मोजण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागेल असं स्पष्ट केलं होतं. भूकंपानंतर हे शिखर काहीसं खचलं असल्याची शक्यता असल्याने पुनर्मोजणीचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. भूकंपाच्या घटनेनंतर चीनमधील आणि इतर काही संस्थांनी ‘माऊंट एव्हरेस्ट’ची उंची मोजण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यातच नेपाळ सरकारने स्वतः यासाठी पुढाकार घेत चीनसोबत संयुक्तपणे मोजणी करत ही नवी उंची जाहीर केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 2:46 pm