जम्मू काश्मीर सरकारची याचिका

जम्मूतील कारागृहात असलेल्या पाकिस्तानातील सात दहशतवाद्यांना तिहार कारागृहामध्ये हलवावे अशी मागणी जम्मू-काश्मीर सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. पाकिस्तानातील सात दहशतवादी स्थानिक कैद्यांना चिथावणी देत असल्याने ही मागणी करण्यात आली आहे.

न्या. एल. एन. राव आणि न्या. एम. आर. शहा यांच्या पीठाने सदर याचिकेवर केंद्र आणि दिल्ली सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

विविध संघटनांशी संबंधित हे दहशतवादी स्थानिक कैद्यांना चिथावणी देत असल्याने त्यांना जम्मूतील कारागृहातून अन्यत्र हलविणे गरजे असल्याचे मत जम्मू-काश्मीर सरकारचे वकील शोएब आलम यांनी व्यक्त केले. या दहशतवाद्यांना तिहार कारागृहात हलविणे शक्य नसल्यास हरयाणा अथवा पंजाबमधील कडेकोट बंदोबस्त असलेल्या कारागृहांमध्ये हलविता येऊ शकते, असेही आलम म्हणाले.

या प्रकरणाची सुनावणी घेण्यात येईल, असे पीठाने आलम यांना सांगितले.

चिथावणी आणि धोका

पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी झाहीद फारुख याला जम्मूतील कारागृहातून अन्यत्र हलविण्याची मागणी केली. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी कारागृहातील अन्य कैद्यांना चिथावणी देत असल्याचे संकेत गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीवरून मिळत आहेत, असे राज्य सरकारने म्हटले आहे. दहशतवाद्यांविरुद्धची सुनावणी दिल्लीला घ्यावी कारण दहशतवाद्यांना कारागृहातून न्यायालयात आणताना आणि परत कारागृहात नेताना सर्वसामान्य नागरिक आणि पोलिसांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, असेही राज्य सरकारने म्हटले आहे.