संसदेत स्वतंत्र तेलंगणाचे विधेयक सादर करताना ‘पेपर-स्प्रे’ चा मारा करणारे सीमांध्रा भागातील खासदार एल. राजगोपाल यांनी आपण स्वसंरक्षणार्थ ‘पेपर-स्प्रे’ वापरल्याचा दावा केला आहे.   या घटनेनंतर राजगोपाल यांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. मात्र, माझ्यावर हल्ला करणा-या काँग्रेसच्या खासदारांनाही निलंबित करावे अशी मागणी राजगोपाल यांनी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमारी यांच्याकडे केली आहे. संसदेतील हौद्यात उभे राहून विरोध करणा-या तेलगु देसम पक्षाचे खासदार वेणुगोपाल रेड्डी यांच्यावर काँग्रेसच्या खासदारांनी हल्ला केला. त्यांचा बचाव करण्यासाठी गेले असताना काँग्रेस खासदारांनी आपल्यावर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वरंक्षणार्थ आपल्याला ‘पेपर-स्प्रे’चा वापर करावा लागल्याचे एल. राजगोपाल यांनी सांगितले.