तालिबानचा प्रमुख मुल्ला ओमर याच्या मृत्यूनंतर त्याच्या जागेवर मुल्ला अख्तर मन्सूर याची नेमणूक करण्याबाबत अफगाण तालिबानच्या सर्वोच्च परिषदेशी (सुप्रीम कौन्सिल) सल्लामसलत करण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे त्याच्या जागी नवा नेता नेमला जाऊ शकतो, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
तालिबान या दहशतवादी संघटनेचे नेतृत्व करण्यासाठी मुल्ला मन्सूर याची निवड करण्यात आली असली, तरी त्याला ‘सर्व तालिबान्यांनी’ नेमलेले नसून हे शरिया कायद्याच्या विरुद्ध आहे, असे तालिबानच्या एका प्रवक्त्याने बीबीसीला सांगितले. संघटनेची प्रभावी अशी सर्वोच्च परिषद नवा नेता निवडण्याकरता बैठक आयोजित करेल असेही तो म्हणाला.
हे सर्वोच्च पद सोडून देण्यासाठी सर्वोच्च परिषद मुल्ला मन्सूरला काही वेळ देईल, असे परिषदेच्या एका वरिष्ठ सदस्याने ‘दि एक्स्प्रेस ट्रिब्यून’ला सांगितले. त्याने यासाठी नकार दिला, तर परिषद नवा नेता निवडेल असेही तो म्हणाला. मन्सूरच्या निवडीबाबत सुप्रीम कौन्सिलशी विचारविनिमय करण्यात आला होता अथवा नाही याबाबत परस्परविरोधी बातम्या आहेत.
ओमरच्या मृत्यूनंतर तालिबान शुरा कौन्सिलची पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सीमेवरील एका अज्ञात स्थळी बैठक होऊन तीत मन्सूरची निवड करण्यात आल्याचे पूर्वीच्या वृत्तांमध्ये म्हटले होते. पाकिस्तानधार्जिण्या गटांनी शांततेच्या वाटाघाटींचा समर्थक असलेल्या मन्सूरचे नेतृत्व लादले आल्याचा आरोप करण्यात आला आहे.