सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात हिंसक विरोध प्रदर्शन सुरु असताना उत्तर प्रदेशात माणुसकीचे दर्शन घडवणारी एक घटना घडली. मागच्या शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यात हिंसक विरोध प्रदर्शन सुरु असताना हाजी कादीर या मुस्लीम व्यक्तीने एका पोलीस कॉन्स्टेबलचे दगडफेक करणाऱ्या जमावापासून प्राण वाचवले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

दगडफेक करण्याआधी तुम्हाला मला मारावे लागेल

हाजी कादीर हे मशिदीतुन नमाज अदा करुन बाहेर पडले होते त्यावेळी हा प्रकार घडला. कादीर यांनी अजय कुमार यांचे प्राण वाचवले. राष्ट्रीय महामार्ग दोनवर असणाऱ्या मशिदीजवळ जमाव आक्रमक झाला होता. जमाव अजय कुमार यांच्या दिशेने चालून येत होता. त्यावेळी कादीर यांनी हस्तक्षेप केला. “अजय कुमार यांच्यावर तुम्हाला दगड फेकायचे असतील तर, तुम्हाला आधी मला मारावे लागेल” असे हाजी कादीर यांनी हिंसक झालेल्या जमावाला सांगितले.

त्यानंतर कादीर यांनी अजय कुमार यांना आपल्या दुचाकीवर बसवले व जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. “मी दुचाकीवरुन डयुटीवर जाण्यासाठी निघालो होतो. नैनी ग्लास चौराहजवळ माझ्यावर जमावाने दगडफेक सुरु केली. त्यावेळी हाजी कादीर माझ्यासाठी मदतीसाठी आले नसते तर, जमावाने मला ठेचून मारले असते. माझे प्राण वाचवण्यासाठी हाजींनी स्वत:चे प्राण संकटात टाकले” असे अजय कुमार यांनी सांगितले.

अजय कुमार यांच्या कुटुंबाने मानले आभार 

अजय कुमार या दगडफेकीमध्ये जखमी झाले होते. त्यांना आग्रा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अजय कुमार १९९७ पासून पोलीस सेवेत आहेत. त्यांना तीन मुले आहेत. कुमार यांनी हाजी कादीर यांना आपल्या निवासस्थानी बोलावले होते. तिथे संपूर्ण कुटुंबाने कादीर यांचे आभार मानले.

“मी मोहम्मद मशिदीमध्ये नमाज अदा करत होतो. त्यावेळी हिंसक झालेला जमाव पोलीस पोषाखातील एका व्यक्तीवर दगडफेक करत असल्याचे मी पाहिले. मी लगेच त्या दिशेने धावत गेलो व कुमार यांची सुटका केली. ते काही अंतरावर गेल्यानंतर पुन्हा त्यांच्यावर दगडफेक सुरु झाली. त्यावेळी मी, पुन्हा हस्तक्षेप केला. कुमार यांच्यावर दगडफेक करण्याआधी तुम्हाला मला मारावे लागेल हे जमावाला निक्षून सांगितले” अशी माहिती हाजी कादीर यांनी दिली.