राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष एम. एस. स्वामिनाथन यांनी मोदी सरकारच्या शेती विषयक धोरणाचे कौतुक केले आहे. शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी सरकारने आखलेली धोरणे आणि योजना या खरोखरच शेतकऱ्यांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आहेत असे स्वामिनाथ यांनी ट्विटरवर म्हटले आहे. केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यासाठी अनेक शिफारसी येत असतात. त्या शिफारसींचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते आहे.

सुधारित बियाणे, आरोग्य कार्ड, सुधारित विमा, शेतकऱ्यांचे पुनर्वसन, सिंचन क्षेत्रातली वाढ या सगळ्या धोरणांबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे ही बाब निश्चितच चांगली आहे असेही स्वामिनाथन यांनी ट्विटरवर म्हटले आहे. तसेच ग्रामिण भागातल्या स्त्रियांच्या कौशल्यांना चालना देण्यासाठीही सरकार विविध योजना आणते आहे. तसेच मोदी सरकारच्या काळात कृषी विद्यापीठे आणि खासगी क्षेत्रांनी ग्रामिण विकासासाठी ५० टक्के योगदान दिले आहे ही बाबही प्रशंसा करण्यासारखीच आहे असेही स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आणि राजस्थान मधले शेतकरी विविध समस्यांनी ग्रासले आहेत. नुकतीच महाराष्ट्र सरकारने अल्प भू धारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली. तर मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये अजूनही ही मागणी होते आहे. महाराष्ट्रात स्वामिनाथन आयोग लागू करावा अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी आपल्या संपादरम्यान केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. तसेच शेतकऱ्याला त्याच्या पायावर उभे करण्यासाठी हा आयोग लागू करावा अशी मागणी केली जाणार आहे. त्या मागणीला सरकार कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

देशातल्या तीन राज्यांमध्ये शेतकऱ्यांचा संघर्ष होतो आहे. महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीची मागणी मान्य झाली आहे, मात्र इतर दोन राज्यांचा प्रश्न तसाच आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एम. एस. स्वामिनाथन यांनी मोदी सरकारचे कौतुक महत्त्वाचे आहे. तसेच या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर स्वामिनाथन यांनी शेतकऱ्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. कृषी क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर द्यावा लागणार आहे. जेणेकरून शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, असेही स्वामिनाथन यांनी ट्विटरवर म्हटले आहे.