पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन देशांच्या दहा दिवसांच्या दौऱ्यावर मंगळवारी रवाना झाले असून ते जागतिक पातळीवरील ४० नेत्यांना भेट णार आहेत. त्याची सुरुवात मोदी यांनी म्यानमारचे अध्यक्ष यू थी सेइन यांची भेट घेऊन केली. म्यानमार आणि ऑस्ट्रेलियात बहुराष्ट्रीय शिखर परिषदा होणार असून त्या पाश्र्वभूमीवर मोदी यांनी अध्यक्षांची भेट घेतली. मोदी हे फिजीलाही भेट देणार आहेत.
येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर मोदी यांनी सेइन यांची अध्यक्षांच्या प्रासादात भेट घेतली. विमानतळावर मोदी यांना मानवंदना देण्यात आली. पारंपरिक पेहेरावातील मुलामुलींनी मोदींचे स्वागत केले. सेइन यांच्याशी ४५ मिनिटे चर्चा केल्यानंतर, ही भेट उत्तम झाल्याचे मोदींनी ट्विट केले.
परस्परसंबंधांवर विविध मुद्दय़ांवर आम्ही सविस्तर चर्चा केली. सांस्कृतिक, वाणिज्य आणि संपर्क आणि दळणवळणात वाढ करणे या बाबत चर्चा केली असेही मोदी म्हणाले. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापक चर्चा झाली आणि परस्परसंबंधांचा आढावाही घेण्यात आला, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अकबरुद्दीन यांनी ट्विट केले आहे. दक्षिण आशियाई देशांसमवेत भारताला अधिक आर्थिक संबंध प्रस्थापित करावयाचे आहेत, असेही ते म्हणाले.
म्यानमारमधील आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांच्या पाश्र्वभूमीवर मोदी रशियाचे अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्यून-हाय आणि सिंगापूरचे अध्यक्ष टोनी टॅन यांची भेट घेणार आहेत. पूर्व आशिया शिखर परिषदेच्या वेळी मोदी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांची प्रथमच भेट घेणार आहेत.

भारताचे ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरण हा ‘आसियान’चा गाभा  
 ने पी ताँ : आसियान-भारत १२व्या शिखर परिषदेला बुधवारपासून येथे सुरुवात होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहा देशांसमवेत प्रादेशिक संपर्क आणि व्यापार आणि नागरिकांमधील संपर्क वाढविण्यासाठी आग्रही भूमिका घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.भारताचे अ‍ॅक्ट ईस्ट धोरण हा आसियानचा गाभा आहे, तेच आमच्या स्वप्नाचे केंद्रस्थान आहे आणि भारत त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही मोदी यांनी नमूद केले आहे.मोदी त्यानंतर ऑस्ट्रेलियात जी-२० शिखर परिषद आणि परस्पर संबंधांबाबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबट यांच्याशी आणि फिजीचे पंतप्रधान जे. व्ही. बैनीमारमा यांच्याशी चर्चा करणार आहेत.