राष्ट्रीय हरित लवादाचे स्पष्टीकरण

अमरनाथ गुंफेत मंत्रोच्चारांचे पठण करण्यास अथवा भजन करण्यासह कोणत्या प्रकारचे निर्बंध घालण्यात आलेले नाहीत, असे गुरुवारी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) स्पष्ट केले. त्याचप्रमाणे हा संपूर्ण परिसर ‘शांतता क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्याचा लवादाचा कोणताही हेतू नाही अथवा तसे घोषितही करण्यात आलेले नाही, असेही लवादाने स्पष्ट केले आहे.

तथापि, कोणत्याही व्यक्तीने अथवा भक्ताने अमरनाथ गुंफेत शिवलिंगासमोर उभे असताना शांतता पाळावी एवढेच निर्बंध लावादाने घातले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे निर्बंध अन्य कोणत्याही भागासाठी लागू नाहीत, असे लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्रकुमार यांनी म्हटले आहे. गुंफेकडे जाणाऱ्या अखेरच्या पायऱ्यांवर यात्रेकरूने कोणतेही साहित्य नेण्यास तेथील मंडळाने मज्जाव केला असून त्याचे पालन करावे, असेही लवादाने म्हटले आहे. अखेरच्या पायऱ्यांपूर्वी कोणतेही निर्बंध नसल्याचे लवादाने म्हटले आहे.

या गुंफेचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी सदर आदेश देण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे ध्वनी, उष्णता आणि कंपने यांचा शिवलिंगावर विपरीत परिणाम होऊ नये हाही त्यामागील हेतू आहे, असे लवादाने म्हटले आहे. सदर आदेशाची प्रत वने आणि पर्यावरण मंत्रालय, जम्मू-काश्मीर सरकारचे मुख्य सचिव, अमरनाथ गुंफा मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांना पाठविण्याच्या सूचना लवादाने आपल्या रजिस्ट्रीला दिल्या आहेत. हरित लवादाने बुधवारी गुंफा शांतता क्षेत्र घोषित केले आणि प्रवेशद्वाराच्या पलीकडे कोणत्याही वस्तू अर्पण करण्यावर निर्बंध घातले.