चीनच्या रस्तेबांधणी पथकांनी गेल्या आठवडय़ात अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे एक किलोमीटर आत घुसखोरी केली, मात्र भारतीय फौजांच्या विरोधानंतर त्यांना हुसकवण्यात यश आले, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. दरम्यान, या वृत्ताकडे लक्ष वेधले असता, आम्ही अरुणाचल प्रदेशचे अस्तित्व कधीच मान्य केलेले नाही, असे वक्तव्य चीनने केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनची पथके ‘ट्रॅक अलाइनमेंट’च्या कामासाठी आली होती आणि भारतीय फौजांनी हटकले असता परत गेली; मात्र जाताना उत्खनन यंत्रांसह रस्ते बांधणीची विविध उपकरणे मागे ठेवली. चिनी पथकांच्या सदस्यांमध्ये नागरिक तसेच गणवेशधारी कर्मचारी होते, असे अरुणाचलमधील स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ही घटना २८ डिसेंबरला, म्हणजे सिक्कीम सेक्टरमधील डोकलाम येथे भारतीय व चिनी फौजांमधील ७३ दिवसांचा तिढा सुटल्यानंतर जवळजवळ ४ महिन्यांनी घडली.

सीमेच्या मुद्दय़ावर आमची भूमिका स्पष्ट आणि सुसंगत आहे. अरुणाचल प्रदेश अस्तित्वात असल्याची गोष्ट आम्ही कधीही मान्य केली नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी दिली. चिनी लोक भारतीय हद्दीत शिरल्याची जी विशिष्ट घटना तुम्ही सांगत आहात, त्याबाबत मला कल्पना नाही, असे ते म्हणाले.

सीमेच्या एक किलोमीटर आत प्रवेश

भारतीय सीमांवर गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना २८ डिसेंबरला अरुणाचलच्या तुतिंग भागात भारतीय सीमेच्या सुमारे एक किलोमीटर आत चीनचे काही नागरिक ‘ट्रॅक अलाइनमेंट’ चे काम करत असल्याचे दिसले. या मुद्दय़ावर दोन्ही बाजूंमध्ये कुठलाही ‘तणाव’ निर्माण झाला नसून, ठरलेल्या प्रक्रियेद्वारे हा मुद्दा सोडवण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, चिनी फौजांनी अरुणाचल प्रदेशात अतिक्रमण केल्याच्या वृत्तावर चीनने मौन बाळगले. मात्र अरुणाचल प्रदेशचे अस्तित्व आम्ही ‘कधीच मान्य केले नाही’, असे बुधवारी सांगितले. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीन दावा करतो.