दिल्लीतील केंद्रीय नियोजन आयोगाच्या कार्यालयाबाहेर मंगळवारी डाव्या पक्षाच्या निदर्शकांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेराव घालून त्यांचे सहकारी अर्थमंत्री अमित मित्रा यांना केलेल्या धक्काबुक्कीमुळे ममता प्रचंड खवळल्या आहेत. १९८४ पासून दिल्लीतील राजकारणात सक्रिय असून गेल्या २५ वर्षांत अशा प्रकारची निंदनीय घटना पाहिलेलीच नाही, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी बुधवारी फेसबुकवर व्यक्त केली.
राजकारण आता गलिच्छ आणि खालच्या थराला पोहोचले आहे. १९८४ साली संसद सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात २५ वर्षे झाली आहेत. मात्र मंगळवारी नियोजन आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर जो काही अनुभव आला तो अतिशय धक्कादायक असून त्याच्याबाबत बोलण्यास शब्दच सुचत नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी फेसबुकवर नमूद केले आहे. घटनात्मक संस्था असणाऱ्या नियोजन आयोगाने पश्चिम बंगालसाठी असणाऱ्या वार्षिक योजनेबाबत अंतिम चर्चा करण्यासाठी बोलावले होते. मात्र त्याच आयोगाच्या कार्यालयासमोर अशा प्रकारचे निंदनीय कृत्य घडल्यामुळे जबरदस्त धक्का बसल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
हल्ल्याचा सर्व थरातून निषेध
दरम्यान, ममता बॅनर्जी व अमित मित्रा यांच्यावरील हल्ल्याचा पश्चिम बंगालमध्ये सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका महाश्वेता देवी यांनी ‘हा प्रकार दुर्दैवी’ असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असभ्य राजकारण करणाऱ्यांचा जनतेशी संबंध तुटला असल्याचेही त्या म्हणाल्या़ राज्यपाल एम़  के. नारायण यांनी या घटनेविरोधात सादर केलेल्या निवेदनाचे त्यांनी या वेळी समर्थन केल़े  गायिका उषा उथ्थुप यांनी कोलकात्यात काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात सहभाग घेत झाल्या प्रकाराचा धिक्कार केला.