‘स्टार वॉर’ चित्रपट मालिकेत दाखवलेल्या ग्रहांसारखा दहावा बाहय़ग्रह दोन ताऱ्यांपासून विशिष्ट कक्षेत सापडला आहे. म्हणजे या ग्रहावर दोन सूर्य उगवलेले दिसतात. स्टार वॉर चित्रपटात जो टाटुनी ग्रह दाखवला आहे त्यावर दोन सूर्य (तारे) उगवताना दिसतात व ते तारे एकमेकांभोवतीची प्रदक्षिणा २७ दिवसांत पूर्ण करतात अशी कल्पना केली आहे. नासाच्या केप्लर दुर्बिणीने त्याचा शोध लागला आहे, या ग्रहाचे नाव केप्लर ४५३ बी असे असून, वसाहतयोग्य ग्रह ताऱ्यापासून ज्या अंतरावर असतात त्या अंतरावर असूनही तेथे जीवसृष्टीस अनुकूल स्थिती नाही कारण तो वायूंचा बनलेला आहे.
सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठातील भौतिकशास्त्र व खगोलशास्त्राचे प्राध्यापक स्टीफन केन यांनी सांगितले, की या ग्रहावर कल्पनेपेक्षा जास्त काही असण्याची शक्यता आहे. या ग्रहाचे आधी किंवा नंतर निरीक्षण केले असते तर कदाचित तेथे ग्रह नाही असा निष्कर्ष काढून वैज्ञानिक मोकळे झाले असते. या प्रकारचे अनेक ग्रह आहेत व आपण ते चुकीच्या वेळी शोधत होतो एवढाच याचा अर्थ आहे. आपल्या सौरमालेच्या बाहेरचे ग्रह शोधण्यासाठी ग्रह ताऱ्याच्या समोरून जाताना ताऱ्याच्या प्रकाशात पडणार फरक लक्षात घेतला जातो. थोडक्यात ती अधिक्रमणाची स्थिती असते व निरीक्षणासाठी तो अवधी अचूक पकडावा लागतो. ग्रहांच्या शोधाच्या या पद्धतीला अधिक्रमण पद्धत म्हणतात. केप्लर ४५३ बी हा ग्रह दोन ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे प्रभावित होतो व त्याची कक्षा काहीशी विचित्र म्हणजे फिरणाऱ्या भोवऱ्याप्रमाणे असते, त्यामुळे या ग्रहांचे अधिक्रमण खगोलवैज्ञानिकांना केवळ ९ टक्के वेळा पाहता येते. त्यामुळे असे ग्रह शोधणे अवघड असते. खरेतर हा ग्रह आता शोधला गेला नसता तर तो शोधण्याची आणखी संधी २०६६ पर्यंत मिळाली नसती. आपण या ग्रहाचा शोध योग्यवेळी लावला आहे, म्हणजे ग्रह शोधण्यासाठी योग्य वेळ महत्त्वाची असते असे केन यांनी सांगितले.
केप्लर ४५३ बी हा ग्रह मातृताऱ्याचा ०.५ टक्के प्रकाश अधिक्रमण काळात अडवतो त्यामुळे संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे, की या ग्रहाची त्रिज्या पृथ्वीच्या ६.२ पट आहे व नेपच्यूनपेक्षा ६० टक्के जास्त आहे. तो वायूचा बनलेला असून खडकांचा बनलेला नाही, त्यामुळे तो ताऱ्यापासून वसाहतयोग्य अंतरावर असूनही जीवसृष्टीस अनुकूल नाही. त्याला खडकाळ पृष्ठभाग असलेले चंद्र असू शकतात, तेथे मात्र जीवसृष्टीस अनुकूल स्थिती असू शकते असे केन यांचे मत आहे. हा ग्रह ज्या ताऱ्यांभोवती फिरतो त्यातील एक सूर्यापेक्षा ९४ टक्के मोठा आहे, तर दुसरा सूर्यापेक्षा २० टक्के मोठा आहे. लहान तारा तुलनेने थंड असून तो मोठय़ा ताऱ्यापेक्षा १ टक्क्यापेक्षाही कमी ऊर्जा बाहेर टाकतो. केप्लर ४५३ बी ग्रहाचा परिभ्रमण काळ २४० दिवस आहे. दोन ताऱ्यांची पहिली प्रणाली २०११ मध्ये केप्लर मोहिमेतच शोधण्यात आली होती. अॅस्ट्रोफिजिकल जर्नल या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

केप्लर ४५३ बी
* ताऱ्यांपासून वसाहतयोग्य अंतरावर असूनही जीवसृष्टी अशक्य.
*ग्रहाच्या चंद्रावर मात्र जीवसृष्टी शक्य.
* दहावा बाहय़ग्रह.
* आता शोधला गेला नसता तर २०६६ पर्यंत वाट पाहावी लागली असती.
* अधिक्रमण तंत्राने शोध.