राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, बांधकामात कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळली तर ठेकेदारांना बुलडोझरखाली टाकू, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. बैतूल येथे असंघटित कामगारांच्या एका सभेत ते बोलत होते.

महामार्गाच्या कामामध्ये वेग असला पाहिजे, त्याचबरोबर दर्जावरही लक्ष दिले पाहिजे, महामार्गाच्या निर्मितीसाठी पुरेसा निधी आहे, मात्र भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, अशी सक्त ताकीदही गडकरी यांनी या वेळी दिली. तंत्रज्ञानाची कमतरता आणि त्याचा वापर करण्याबाबतची पुरेशी माहिती यांच्या अभावामुळे महामार्गाच्या दर्जावर त्याचा परिणाम होतो, प्रकल्पांची कामे उत्तम झाली तर देशाची प्रगती होईल, असेही ते म्हणाले.

आपण शेतकरी आहोत, चार साखर कारखाने आहेत, कर्जाच्या ओझ्यामुळे ते बंद झाले तर भाजपच्या हातातून लोकसभेचे चार मतदारसंघ जातील, असेही ते म्हणाले.