लग्न समारंभात जीन्स घालणाऱ्या मुलींशी कोणत्याही मुलाला लग्न करावेसे वाटणार नाही, असे वक्तव्य करून केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. ते सोमवारी गोरखपूर येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मुक्ताफळे उधळली. एखादी व्यक्ती जीन्स घालून मंदिराचा महंत होण्याची भाषा करत असेल तर, लोक त्याला स्वीकारतील का? ही गोष्ट लोकांच्या पचनी पडणार नाही. इतकेच काय एखादी मुलगी स्वत:च्या लग्नातील विधींच्यावेळी जीन्स घालून बसणार असेल तर किती मुलांना अशा मुलीशी लग्न करावेसे वाटेल, असा सवाल सत्यपाल सिंह यांनी विचारला. सूत्रांच्या माहितीनुसार, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. त्यामुळे आता यावरून नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

यापूर्वीही भाजपचे साक्षी महाराज, गिरीराज सिंह , साध्वी प्राची यासारख्या नेत्यांच्या वाचाळपणामुळे पक्ष अनेकदा अडचणीत आला आहे. मात्र, भाजपच्या नेतृत्त्वाने यावर मौन बाळगणेच पसंत केले होते. भाजपकडून स्वपक्षीय किंवा विरोधी पक्षातील नेत्यांना योग्य संदेश देण्याकरिता अशा वाचाळवीरांचा उपयोग करून घेतला जातो, असा आरोपही विरोधक सातत्याने करत असतात. त्यामुळे आता सत्यपाल सिंह यांच्या वक्तव्यावर भाजप काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

वाचाळवीरांना कोण आवरणार?