पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ गिलानी यांचे पुत्र अली हैदर यांचे मुलतानमध्ये गुरुवारी सशस्त्र इसमांनी अपहरण केल्यानंतर त्यांचा पोलिसांना अद्याप शोध लागलेला नाही. ‘अपहरणकर्त्यांकडून आम्हाला कोणताही संदेश मिळालेला नाही. माझ्या मुलाचा शोध घेण्यासाठी आयएसआयची मदत घेणार आहे,’ असे गिलानी यांनी येथे सांगितले. गिलानी हे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.
२७ वर्षीय अली हैदर हे निवडणूक प्रचारसभेत भाषण करीत असताना सहा ते आठ सशस्त्र इसमांनी त्यांचे गुरुवारी अपहरण केले. त्यांचे खासगी सचिव आणि अंगरक्षकाला या इसमांनी गोळ्या घालून ठार केले होते. पंजाब प्रांताच्या दक्षिण भागात पंजाबी तालिबानी अतिरेकी दडून बसल्याचा संशय पाकिस्तान पीपल्स पार्टीला असून त्यांच्याविरोधात कडक पावले उचलण्याचा आग्रह या पक्षाने पंजाब सरकारकडे धरला आहे. ‘लष्कर-ए-झांगवी’ व ‘सिपाह-ए-सहाबा’ या दोन दहशतवादी संघटनांकडून अली हैदर यांना धोका असल्याचे संकेत शुक्रवारी मिळाले.