बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता फेटाळून लावताना मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी येत्या २० तारखेला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. नितीशकुमार हे ‘बोगस’ आमदारांची परेड करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सरकार स्थापनेचा दावा करणारे नितीशकुमार हे आमदारांना कच्छपी लावण्यासाठी, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत, परंतु हे पूर्णपणे खोटे आहे. माझी तशी इच्छा असती, तर मी केव्हाच तशी शिफारस केली असती. २० फेब्रुवारीला मी बहुमत सिद्ध करीन, असे मांझी यांनी पत्रकारांना सांगितले. आपण कार्यालयीन कामासाठी केंद्रीय मंत्री व राज्यपालांना भेटलो होतो, असे ते म्हणाले. मला मदत करायची की नाही हे भाजपने ठरवायचे आहे. मी प्रत्येक पक्षाला मला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे, असे मांझी म्हणाले. ज्या १३० आमदारांना राज्यपाल व राष्ट्रपतींकडे नेले होते, त्यांचा आपल्यालाच पाठिंबा असल्याच्या नितीशकुमार यांच्या दाव्याबाबत विचारले असता, ‘त्यांच्यापैकी अनेक आमदार बोगस होते’, असा उलटवार मांझी यांनी केला.