आधीच्या निर्णयास मुदतवाढ

राष्ट्रीय महामार्गावर १८ नोव्हेंबपर्यंत टोल आकारणी केली जाणार नाही, असे सरकारने आज स्पष्टच केले, आधीची मुदत सरकारने चार दिवस वाढवली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की राष्ट्रीय महामार्गावर वागतूक सुरळीत व्हावी व रोखीची चणचण असलेल्या लोकांना दिलासा मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक लोक एटीएमच्या समोर रांगा लावून उभे आहेत कारण ५०० व १००० रुपयांच्या नोटा सरकारने रद्द केल्या आहेत. टोल न घेण्याच्या सूचना बीओटी, ओएमटी ऑपरेटर्स व इतर शुल्क संकलकांना देण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याचे जाहीर केल्यानंतर सरकारने ९ नोव्हेंबरला असा आदेश जारी केला होता, की ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर टोल आकारणी केली जाणार नाही नंतर ही मुदत १४ नोव्हेंबपर्यंत वाढवण्यात आली. सरकारने आधी जुन्या नोटा टोल प्लाझावर स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता पण पुरेसे सुटे पैसे नसल्याने गोंधळ झाले व वाहतूक कोंडी होऊ लागली, त्यामुळे टोल काही काळ बंद करण्यात आला. आम्ही परिस्थितीचा फेरआढावा घेतला असून शुल्क संकलन बंद ठेवले आहे, असे रस्ते व महामार्ग वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. टोल वसुली बंद ठेवल्याने किती तोटा झाला असे विचारले असता त्यांनी ‘सरकार हा तोटा सहन करील,’ असे त्यांनी सांगितले.