वादग्रस्त विधानांच्या यादीत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी भर घातली आहे. उत्तर भारतीय लोकांना कायदे तोडायला नेहमी मजा येते, असे वादग्रस्त वक्तव्य करून रिजीजू यांनी वाद ओढावून घेतला आहे. पोलिसांशी संबंधित एका कार्यक्रमाच्या उदघटनावेळी बोलत असताना दिल्लीच्या माजी उपराज्यपालांच्या एका विधानाचा आधार घेत रिजीजू यांनी वरील वक्तव्य केले. उत्तरेतील लोक नियम, कायदे तोडल्याचा अभिमान बाळगतात. पोलीस अधिकाऱयांशी हुज्जत घालण्यात त्यांना आनंद वाटतो, असे सांगत रिजीजू यांनी प्रत्येक गोष्टीसाठी पोलिसांना दोषी धरणे योग्य नसल्याचे म्हटले. पोलीस असभ्य वर्तन करत असल्याची तक्रार अनेकजण करतात पण नागरिक नियम तोडायला लागले की पोलीस कठोर होणारच, असेही रिजीजू पुढे म्हणाले.