गेल्या काही दिवसांपासून अणुचाचण्यांचे भय तांडव करणारे उत्तर कोरिया धोकारेषेच्या टोकावर असल्याचे अमेरिकेने म्हटले असून, राष्ट्रीय नेत्यांच्या नावाने होणाऱ्या वार्षिक उत्सवात दंग असलेले हे राष्ट्र सातत्याने आपली क्षेपणास्त्रे विविध ठिकाणी हलवून पहारा देणाऱ्या दक्षिण कोरिया-अमेरिकेसह जगाच्या डोळ्यांत धूळ फेकत आहे.
नवे काय?
कोणत्याही क्षणी उत्तर कोरिया अणुचाचण्या घेण्याची शक्यता असल्याचा अतिदक्षतेचा इशारा दक्षिण कोरियाने दिला असून, उत्तर कोरियाने धोक्याची रेषा ओलांडल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. नवे नेते किम जोंग-उन यांच्या पदाचे वर्ष गुरुवारी साजरे करण्यात आले. पुढील आठवडय़ामध्ये दिवंगत नेते किम संग यांची जयंती साजरी केली जाणार आहे. या दरम्यान, कधीही अणुचाचण्या होऊ शकतील, असा इशारा दक्षिण कोरियाने दिला आहे. या तणावस्थितीमध्ये अमेरिकेची अनेक शिष्टमंडळे येत्या आठवडय़ामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर कोरिया सातत्याने आपली अण्वस्त्रांची जागा बदलत असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने यॉनहॅप वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
रशियाची अमेरिकेला साथ
उत्तर कोरियाने निर्माण केलेल्या अणुतणावाविरोधात भूमिका घेत रशियाने याबाबत अमेरिकेसोबत असल्याचे स्पष्ट केले. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेइ लॅव्हरोव्ह यांनी सांगितले की, लष्करी ताकदीच्या बळावर कुणीच कुणाला घाबरवू शकत नाही, मात्र उत्तर कोरियाबाबतच्या भूमिकेमध्ये आमचे अमेरिकेशी कोणतेही दुमत नाही. सध्या निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी नमूद केले.