पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक लाहोरमध्ये जाऊन त्यांचे समपदस्थ नवाझ शरीफ यांची भेट घेतली, त्यानंतर आता मार्चमध्ये या दोघा नेत्यांची भेट अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन येथे अणुसुरक्षा शिखर बैठकीच्या निमित्ताने होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मार्चच्या अखेरीस होणाऱ्या या बैठकीचे निमंत्रण मोदी व शरीफ या दोघांनाही दिले आहे; फक्त त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
भारत व पाकिस्तान हे दोन्ही अण्वस्त्रधारी देश असल्याने त्यांना ३१ मार्च ते १ एप्रिल २०१६ दरम्यान होणाऱ्या बैठकीस बोलावण्यात आले आहे. त्याची अधिकृत घोषणा अजून झालेली नसली तरी शरीफ व मोदी यांना २०१६ मध्ये द्विपक्षीय चर्चेत प्रगती करण्यासाठी ही संधी असणार आहे. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्यानंतर मोदी यांनी अचानक लाहोरला भेट देऊन सर्वाना चकित केले होते. गेल्या दशकभराच्या कालावधीनंतर पाकिस्तानला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्या लाहोर भेटीनंतर भारत-पाकिस्तान संवाद प्रक्रियेला पुन्हा चालना मिळाली असून त्या दिशेने पुढील वर्षीही प्रगती होऊ शकते. मोदी-शरीफ यांच्या नववर्षांतील वॉशिंग्टन भेटीच्या आधी जानेवारीत पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव पातळीवर चर्चा होणार आहे.