अॅपच्या माध्यमातून टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ओला उबेर यांसारख्या कंपन्यांच्या व्यवसाय वाढीत आता घट होताना पहायला मिळत आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये दररोजच्या फेऱ्यांमध्ये केवळ 4 टक्क्यांची वाढ झाली असून ती 35 टक्क्यांवरून 36.5 लाखांवर पोहोचल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळे प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत असून टॅक्सी सेवेसाठी 12 ते 15 मिनिटांची प्रतिक्षा करावी लागत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी जास्तीतजास्त 2 ते 4 मिनिटांमध्ये प्रवाशांना टॅक्सी सेवा मिळत होती. तसेच मोठ्या शहरांमध्येही नॉन पीक अवर्समध्ये टॅक्सी सेवेच्या भाड्यात 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे.

रस्त्यांवर सुरू असलेल्या ओला उबेरच्या संख्येवर कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. दरम्यान, भारत आणि दक्षिण आशियामध्ये कंपनीचा व्यवसाय वाढत आहे. येत्या काळात शेअर, मल्टी मॉडेल आणि इलेक्ट्रीक असे वाहतुकीचे भविष्य आहे. चालकांना मिळणारे इंसेंटीव्ह कमी झाल्यामुळे टॅक्सीच्या संख्येत घट झाली आहे. त्याचाच परिणाम व्यवसायावर झाला आहे. 2018 मध्ये 20 टक्क्यांची तर तर 2017 आणि 2016 मध्ये अनुक्रमे 57 टक्के, 90 टक्क्यांची ग्रोथ झाली असल्याचे उबेरच्या प्रवक्त्यांनी सांगितले. इकॉनॉमिक टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

ओला उबेरच्या व्यवसायात घट होण्याचे दुसरे कारण कमर्शिअल व्हेइकल रजिस्ट्रेशन असल्याचे समोर आले आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात 2017-18 मध्ये ओला उबेरसाठी काम करणाऱ्या 66 हजार 683 कॅबचे रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. त्यानंतर 2018-19 मध्ये त्यामध्ये घट होऊन 24 हजार 386 कॅबचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. गेल्या वर्षभरात चालकांना मिळणाऱ्या इंसेटीव्हसमध्येही 40 टक्क्यांची घट झाली आहे. तर बंगळुरूतही चालकांच्या संख्येत 25 ते 30 टक्क्यांची घट झाली आहे.

दरम्यान, ओला इलेक्ट्रीक मोबिलिटीसाठी एक योजना तयार करत असल्याची माहिती ओलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितली. याव्यतिरिक्त सेल्फ ड्राईव्ह आणि रेंटल व्हर्टिकलमध्येही भविष्य असून इंटरनॅशनल एक्सपांशनसाठी कंपनी विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. ओलाने इलेक्ट्रीक व्यवसायासाठी टायगर ग्लोबल, मॅट्रिक्स पार्टनर आणि रतन टाटा यांच्याकडून 400 कोटींपेक्षा अधिक रक्कम उभी केली आहे.