सांस्कृतिक सामंजस्यासाठी मोदींची घोषणा

देशातील प्रत्येक राज्याने दरवर्षी एका राज्याची निवड करून आपली संस्कृती आणि भाषा यांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न करावा, अशी अभिनव योजना सुरू करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.
सदर योजनेला ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ असे नाव देण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्याची घोषणा केली. देशातील सांस्कृतिक दरी सांधण्यासाठी आणि विविध राज्यांमध्ये राहणाऱ्या जनतेमध्ये सुसंवाद साधण्यासाठी सदर योजना लवकरच सुरू केली जाणार आहे.
या योजनेसाठी एक समिती तयार करण्यात आली असून ती या योजनेचे स्वरूप तयार करीत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. प्रस्तावित योजनेची अंमलबजावणी राज्यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
दरवर्षी एक राज्य देशातील कोणत्याही एका राज्याशी जोडले जावे, अशी यामागील संकल्पना आहे. हरयाणा राज्य तामिळनाडूशी २०१६ मध्ये जोडले गेले तर हरयाणाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना तामिळ भाषेतील किमान १०० वाक्ये शिकविण्यात येतील, असे मोदी म्हणाले.
त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना तामिळ भाषेतील किमान एक गाणे शिकविण्यात येईल. अन्न महोत्सव, हरयाणातील जनतेसाठी तामिळनाडूचा दौराही आयोजित केला जाईल. त्यानंतरच्या वर्षांत हरयाणा आणखी एका राज्याशी जोडले जाईल आणि त्यामुळे भारताची विविधतेतून एकता खऱ्या अर्थाने उमगेल, असेही मोदी म्हणाले.
रामेश्वरम ते दिल्ली या रेल्वेच्या पहिल्या प्रवासात आपल्याला देशाच्या विविधतेचे प्रकर्षांने आकलन झाले होते, असे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितल्याचे उदाहरण मोदी यांनी या वेळी दिले. कोणत्याही पुस्तकापेक्षाही त्या वेळी आपल्याला संस्कृती आणि विविधता यांचा अधिक अनुभव आला होता, असेही डॉ. कलाम म्हणाले होते.