पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पुंछमधील मनकोट येथे सैन्यदलातील एका जवानाला वीरमरण आले. चंदन कुमार राय असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. गेल्या चार दिवसांत पाकिस्तानकडून सीमेवर नाहक गोळीबार केला जात आहे. यात आतापर्यंत सहा जवान हुतात्मा तर सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी जम्मू भागातील आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. पुंछ जिल्ह्यातील कृष्णा सेक्टरमध्ये लष्कराचा जवान मनदिप सिंग (वय २३) शहीद झाला होता. तो पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील आलमपूर गावातील रहिवासी होता. दरम्यान, शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या तीन जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या परिसरात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला होता. पाकिस्तानने जम्मू, सांबा आणि कठुआ जिल्ह्यात तुफान गोळीबार केला. यामध्ये सांबा सेक्टरमध्ये गोळीबारात जखमी झालेले बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल जगपाल सिंह (वय ४९) यांचा मृत्यू झाला. ते उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरातील रहिवासी होते.

जम्मू आणि सांबा जिल्ह्यातील तीन सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ भारतीय चौक्यांवर गुरूवारी पाकिस्तानच्या गोळीबार आणि तोफांच्या माऱ्यामुळे बीएसएफचा एक जवान शहीद झाला. तर एका मुलीचा मृत्यू झाला होता. शहीद जवानाचे नाव हेडकॉन्स्टेबल ए सुरेश असे असून ते तामिळनाडूचे रहिवासी होते. गोळीबारात मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव नीलमदेवी असे आहे. काश्मीर खोऱ्यात मागील तीन वर्षांत दहशतवादी हल्ल्यात १९५ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले आहेत. वर्ष २०१७ मध्ये ७८, वर्ष २०१६ मध्ये ७४ आणि वर्ष २०१५ मध्ये ४३ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले.