बर्दवान स्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी जमात-ऊल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेचा अत्यंत महत्त्वाचा सदस्य असलेल्या अमजद शेख याला अटक केली.
शेख ऊर्फ काजल (३०) हा पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्य़ातील रहिवासी असून स्फोटांसाठी लागणारे साहित्य खुल्या बाजारातून उपलब्ध करून देणारा तो मुख्य हस्तक आहे. खुल्या बाजारातून रसायने विकत घेऊन ती आपल्या साथीदारांना उपलब्ध करून देण्यात शेख याची महत्त्वाची भूमिका होती, असे एनआयएच्या वतीने सांगण्यात आले. बांगलादेशचा नागरिक असलेला साजिद हा या स्फोटाचा मुख्य सूत्रधार तो अटक करण्यात आलेला दुसरा अत्यंत महत्त्वाचा आरोपी आहे.

एनआयएच्या कार्यालयाजवळ स्फोट
कोलकाता : बर्दवान स्फोटांची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तात्पुरत्या कार्यालयाबाहेर सोमवारी सायंकाळी किरकोळ स्फोट झाला.केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संकुलात एनआयएचे तात्पुरते कार्यालय उघडण्यात आले असून तेथे सोमवारी सायंकाळी कच्च्या बॉम्बचा स्फोट झाला. त्यामध्ये कुंपणाचे नुकसान झाले.