विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाची बंदूक हिसकावून घेणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी गोळी घालून ठार केली आहे. त्या व्यक्तीने पोलिसांची बंदूक हिसकावल्यानंतर पॅरिसच्या ऑर्ली विमानतळावर थरारनाट्य घडले.  त्याने पोलिसांजवळील बंदूक हिसकावून घेतली आणि तो विमानतळावर असलेल्या एका दुकानात घुसला. आज सकाळी साडे आठ वाजता हा प्रकार घडला. दुकानात घुसल्यानंतर त्याने कुणाला ओलीस ठेवले नाही परंतु तातडीने विमानतळावर रिकामे करुन घेण्यात आले. यावेळी अंदाजे तीन हजार लोकांना विमानतळाबाहेर तातडीने बाहेर काढण्यात आल्याचे गृह मंत्री ब्रुनो ले रॉक्स यांनी सांगितले. यावेळी कुणीही जखमी झाले नाही असे त्यांनी म्हटले. ऑर्लीकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.  त्या व्यक्तीला शरण येण्याची विनंती पोलिसांनी केली होती. परंतु त्याने आपल्या हातातील बंदूक टाकून दिली नाही त्यामुळे त्याच्यावर गोळी चालवण्यात आली. त्या हल्ल्यात तो ठार झाला. गुरूवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मंडळाबाहेर लेटर बॉम्बचा स्फोट झाला होता तर त्याच दिवशी एका शाळेत एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार देखील केला होता.  गेल्या काही दिवसांपासून फ्रांसमध्ये होणाऱ्या हल्ल्यामध्ये वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता तर जुलै २०१६ मध्ये ट्रक हल्ला देखील झाला होता.