19 January 2018

News Flash

ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये झाला भारतीय शब्दांशी ‘खेळ’!

जगभरात इंग्रजी शिकणाऱ्यांना ‘बायबल’समान असणाऱ्या ऑक्सफर्ड शब्दकोशाची पुनर्रचना करताना रॉबर्ट बर्चफिल्ड या माजी संपादकांनी परदेशी मूळ असलेले हजारो शब्द गुप्तपणे काढून टाकले असल्याचे उघड झाले

पी.टी.आय., लंडन | Updated: November 29, 2012 4:54 AM

जगभरात इंग्रजी शिकणाऱ्यांना ‘बायबल’समान असणाऱ्या ऑक्सफर्ड शब्दकोशाची पुनर्रचना करताना रॉबर्ट बर्चफिल्ड या माजी संपादकांनी परदेशी मूळ असलेले हजारो शब्द गुप्तपणे काढून टाकले असल्याचे उघड झाले आहे. या शब्दांमध्ये भारतीय शब्दांचाही समावेश असल्याचा दावा नव्या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. ऑक्सफर्ड शब्दकोशाच्या माजी संपादकपदाची धुरा सांभाळणाऱ्या सारा ओगिल्वी यांनी ‘वर्डस् ऑफ  द वर्ल्ड’ या नव्या पुस्तकामध्ये या माहितीवर प्रकाश टाकला आहे. रॉबर्ट बर्चफिल्ड हे १९७० ते ८० या काळामध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीचे संपादक होते. २००४ साली त्यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये परदेशी मुळं असणाऱ्या हजारो शब्दांना शब्दकोशामधून तिलांजली दिल्याचे ओगिल्वी यांनी पुस्तकामध्ये म्हटले आहे. ऑक्सफर्ड शब्दकोश बर्चफिल्ड यांनी गाळलेल्या शब्दांना पुन्हा शब्दकोशाच्या नव्या आवृत्तीमध्ये वापरण्याचा विचार करीत असल्याचे ‘डेली मेल’ने वृत्तामध्ये म्हटले आहे.     

प्रकरण काय?
ऑक्सफर्ड शब्दकोशाच्या संपादकपदी १९७०च्या दशकात विराजमान झालेल्या रॉबर्ट बर्चफिल्ड यांचा विस्तृत आणि परिपूर्ण शब्दकोश तयार केल्याबद्दल गौरव करण्यात आला होता. त्या वेळी आपल्या पूर्वसुरींनी चुकांमुळे अनेक परदेशी मूळ असलेले शब्द ऑक्सफर्डमधून वगळलेत असा कांगावा त्यांनी केला होता. सारा ओगिल्वी यांनी तपशिलात संशोधन केल्यावर त्यांना बर्चफिल्ड यांच्या पूर्वसुरींनी नव्हे, तर खुद्द बर्चफिल्ड यांनीच शब्द गाळले असल्याचे सत्य समोर आले. याशिवाय बर्चफिल्ड यांनी आपल्या आधीच्या संपादकांबाबत खोटय़ा कंडय़ा पिकविल्याचेही त्यांच्या लक्षात आले. बर्चफिल्ड यांच्या आधी संपादकपदी असलेल्या जेम्स मरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनतीने जगभरातील हजारो शब्दांना गोळा केले होते. त्या शब्दांची बर्चफिल्ड यांनी कत्तल केल्याचा ओगिल्वी यांचा दावा आहे. १९७२ ते ८६ या कार्यकाळामध्ये बर्चफिल्ड यांनी चार शब्दकोशांच्या आवृत्त्या संपादित केल्या. त्यात ओगिल्वी यांच्या मते एकूण १७ टक्के परदेशी मूळ असलेले शब्द गाळून टाकण्यात आले.  

कोणते भारतीय शब्द गाळले?
रानडुकराप्रमाणे असलेल्या प्राण्याबाबत म्हटल्या जाणाऱ्या ‘बालीसुअर’ (बालीसॉर), बंगालमधील एक वनस्पती ‘डांची’ आणि ब्रिटिश गयाना येथील नदीकिनारी राहणाऱ्या ‘बोविअ‍ॅण्डर’ या मिश्रवंशीय शब्दांना ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये काम करताना बर्चफिल्ड यांनी गाळले आहे. इतर आशियाई राष्ट्रांमधील शेकडो शब्दांना बर्चफिल्ड यांनी काढून टाकले आहे.

आपली भाषा बिघडविणाऱ्या बेसुमार ‘फॅशनेबल’ शब्दांचा समावेश केल्याबाबत सुरुवातीपासून ऑक्सफर्डच्या संपादकांवर टीका होत आली आहे. मात्र या प्रकारामुळे शंभर वर्षांनंतर लोक परदेशी मुळांचे प्रचलित शब्द नसल्याबद्दल शब्दकोशावर टीका करतील     – सारा ओगिल्वी

First Published on November 29, 2012 4:54 am

Web Title: oxford dictionary plays with indian words
  1. No Comments.