केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

परदेशातून मदतीच्या स्वरूपात मिळालेल्या वस्तूंना लगेच ‘क्लीअरन्स’ दिला जात असल्यामुळे, या वस्तू आयात होणाऱ्या कुठल्याही बंदरावर एकही ऑक्सिजन कॉन्संट्रेटर पडून नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.

करोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेविरुद्ध केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेश सामूहिक लढा देत आहेत. त्याला पाठिंबा म्हणून जगभरातून एकूण ३ हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स मिळाले आहेत. चीनने १ हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स पाठवले असून, आयर्लंडकडून ७००, ब्रिटनकडून ६६९, मॉरिशसने २००, उझबेकिस्तानने १५१, तायवानने १५०, रोमानियाने ८०, थायलंडने ३० तर रशियाने २० कॉन्संट्रेटर्स पाठवले आहेत, अशी माहिती मंत्रालयाने एका निवेदनात दिली.

ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स सीमा शुल्क विभागाच्या गोदामांमध्ये मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत पडून आहेत, असा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला होता. ‘ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि निराधार आहे. भारतीय सीमा शुल्क विभागाकडे अशा कुठल्याही वस्तू पडून नसल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमा शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे’, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

८९ लाखांहून अधिक  लशी उपलब्ध

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडे ८९ लाखांहून अधिक लशी सध्या उपलब्ध असून, येत्या ३ दिवसांत त्यांना आणखी २८ लाखांहून अधिक लशी मिळतील असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. केंद्राने आतापर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना १७ कोटींहून अधिक लशी मोफत पुरवल्या आहेत.