एअरसेल मॅक्सिस प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने प्राथमिक माहिती अहवालात नाव नसताना माझ्या विरोधात सुडाने चौकशी चालवली आहे. त्यांच्या सर्व आरोपांना न्यायालयात उत्तरे दिली जातील, असे वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम व त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना या प्रकरणात सात ऑगस्टपर्यंत दिल्ली न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे.

माजी अर्थमंत्री असलेल्या चिदंबरम यांनी सांगितले, की एअरसेल मॅक्सिस प्रकरणात प्राथमिक माहिती अहवालात माझे नाव नाही. कुठल्याही लोकसेवकाचे नाव नाही. सक्तवसुली संचालनालयाने या प्रकरणी चौकशीत सुडाची भूमिका घेतली आहे. त्यांच्या आरोपांना न्यायालयात उत्तरे दिली जातील.

३० मे रोजी चिदंबरम यांनी अटकेपासून संरक्षणासाठी ३० मे रोजी न्यायालयात धाव घेतली होती त्यांनी असे म्हटले होते, की या प्रकरणातील सर्व पुरावे हे कागदोपत्री असून ते सरकारच्या ताब्यात आहेत, त्यात आता माझ्याकडून हस्तगत करण्यासारखे काही उरलेले नाही. यापूर्वी न्यायालयाने कालपर्यंत पी. चिदंबरम व कार्ती चिदंबरम यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. एअरसेल मॅक्सिस या २ जी स्पेक्ट्रममधील प्रकरणात सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाने २०११ व २०१२ मध्ये दोन गुन्हे दाखल केले होते.