पाकिस्तान हा देश दहशतवादीची फॅक्ट्री असल्याचे भारताने म्हटले आहे. गुरूवारी दिल्लीत परराष्ट्र एस. जयशंकर यांनी हे उद्गार काढले आहेत. तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनीही कठोर शब्दात पाकिस्तानावर निशाणा साधला आहे. पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवाया करणे बंद करावे. तसेच पाकिस्तानने अफगाणिस्तानतली घुसखोरी रोखावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तान हा देश दहशतवादाची फॅक्ट्री आहे असे म्हटले आहे. तसंच या देशाशी एक शेजारी देश म्हणून व्यवहार करणे याचमुळे थांबवण्यात आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतून व्हिडिओ लिंकच्या आधारे बकिंगमशायरमध्ये यूके-इंडिया वीक या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. त्याच कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानवर ताशेरे झाडले आहेत.

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन ठरते आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण हेच आहे की पाकिस्तान सरकार या दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. दहशतवाद हे भारताविरोधात वापरण्याचे शस्त्र आहे अशी पाकिस्तानची मानसिकता आहे. त्याचमुळे पाक सरकार दहशतवादाला खतपाणी घालतंय अशीही टीका जयशंकर यांनी केली. मात्र भारत हे कधीही सहन करणार नाही असेही त्यांनी सुनावले आहे.

अमेरिकेने पाकिस्तानविरोधात काही कठोर पावलं उचलली आहेत, अशी माहिती माइक पोम्पिओ यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली. पाकिस्तानने लवकरात लवकर भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखाव्यात यासाठी आम्ही ही पावलं उचलली आहे. तसेच पाकिस्तान अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांना मदत करतो आहे. या देशाने हे धोरणही थांबवावं असंही पोम्पिओ यांनी म्हटलं आहे.