नागोर्नो-काराबाख या भूप्रदेशावरील मालकी हक्कावरुन सध्या आर्मेनिया आणि आझरबैजान या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु आहे. टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगान या युद्धात आझरबैजानच्या बाजूने उभे राहिले असून त्यांनी या युद्धासाठी आर्मेनियाला जबाबदार धरले आहे. हेच एर्दोगाने काश्मीरच्या विषयामध्ये सुद्धा हस्तक्षेप करत असतात. त्यावरुन भारताने त्यांना खडेबोलही सुनावले आहेत.

आर्मेनिया आणि आझरबैजान हे सोव्हिएत रशियापासून वेगळे झालेले देश आहेत. रशिया आतापर्यंत नेहमीच आर्मेनियाच्या बाजूने उभा राहिला आहे.

पाकिस्तानने युद्धात उडी घेतली का?
आर्मेनिया आणि आझरबैजानमध्ये सुरु असलेल्या युद्धात पाकिस्तानने उडी मारल्याची चर्चा आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अगदममध्ये आर्मेनिया विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानच्या सैन्य तुकडया पाठवल्याच्या बातम्या येत आहेत. रणांगणावर आझरबैजान, टर्की आणि पाकिस्तान आर्मेनिया विरोधात एकत्र आले आहेत.

युद्ध सुरु असलेल्या भागात दोन स्थानिकांमध्ये टेलिफोनवरुन संवाद झाला. त्यात आझारबैजानच्या दोन नागरिकांनी बोलताना तिथे पाकिस्तानींची उपस्थित असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी सैनिक जमा झाले असून त्यांना अगदमच्या दिशेने नेण्यात येत आहे, असे स्थानिक ऐकमेकांना सांगत होते. टाइम्स नाऊने फ्रि न्यूज. एएमच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. १९९१ साली टर्कीनंतर आझारबैजानच्या सार्वभौमत्वाला मान्यता देणारा पाकिस्तान दुसरा देश आहे. तेव्हापासून, पाकिस्तान आझरबैजानसोबत चांगले लष्करी संबंध राखून आहे.

युद्धाचे कारण काय?
दोन्ही देश चार हजार ४०० वर्ग किलोमीटरच्या भूप्रदेशावरील हक्कावरुन एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. नागोर्नो- काराबाख असं या प्रदेशाचं नाव आहे. या प्रदेशावर दोन्ही देश आपला हक्क सांगत आहेत. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार नागोर्नो हा आझरबैजानचा प्रदेश आहे. मात्र यावर आर्मेनियातील जातीय गटांनी ताबा मिळवला आहे.
१९९१ साली या प्रदेशातील लोकांनी आझरबैजानपासून या प्रदेशाला आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिल्याचे घोषित केलं. मात्र हा दावा आझरबैजानने पूर्णपणे फेटाळू लावला आणि यावरुनच आता दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहे.