रमझान महिन्यातील दैनंदिन उपवास सोडण्यापूर्वी (इफ्तार) कथितरीत्या खाद्यपदार्थाची विक्री व सेवन केल्याबद्दल पाकिस्तानातील एका हिंदू वृद्धाला पोलीस शिपायाने मारहाण केली. या घटनेबाबत समाजमाध्यमांवर संताप व्यक्त झाल्यानंतर या पोलिसाला अटक करण्यात आली.

सिंध प्रांताच्या घोटकी जिल्ह्य़ातील दुर्गम भागात असलेल्या हयात पिताफी या खेडय़ात ही घटना घडली.

सूर्यास्ताच्या वेळच्या ‘इफ्तार’पूर्वी खाद्यपदार्थ विकणाऱ्या गोकल दास याला अली हसन या शिपायाने जबर मारहाण केली. आपण दास याला केळी खातानाही पाहिल्याचा अलीचा दावा होता.

अली व त्याच्या भावाने या वृद्धाला जमिनीवर फेकून दिले व बेदम मारहाण केली. लोकांनी नंतर त्याची सुटका केली, असे जवाहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार बचल काझी यांनी सांगितले.

यानंतर रक्तस्राव होत असलेल्या दास यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. हाताला जखम झालेल्या आणि शर्टावर रक्ताचे डाग असलेल्या दास यांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणात पसरली. पोलिसांनी रमझानच्या महिन्यात दाखवलेल्या या असहिष्णुतेवर सामाजिक व नागरी हक्क कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनीही जोरदार टीका करून या शिपायाला योग्य ती शिक्षा देण्याची मागणी केली. यानंतर सिंध प्रांताच्या पोलीस महानिरीक्षकांनी शिपाई अली याच्या अटकेचे आदेश दिले. पाकिस्तानच्या दक्षिणेकडील सिंध प्रांतात मोठय़ा संख्येत राहतात.