पाटण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सभेआधी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीनचा हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे. या स्फोटांप्रकरणी बिहार पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्यापैकी एक असलेला मोहमद इम्तियाज याचा इंडियन मुजाहिदीनशी संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे.
मोदींच्या सभेत स्फोटांची मालिका
इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी तहसीन अख्तर ऊर्फ मोनू याच्या इम्तियाज याच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे तपासात आढळले. त्यावरूनच हे स्फोट इंडियन मुजाहिदीन घडवून आणल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अख्तर हा बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी असून, बिहारमध्ये इंडियन मुजाहिदीनचे जाळे पसरविण्याचे काम अख्तर करीत आहे. इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या रियाज भटकळ याच्या मदतीने अख्तर यानेच हा स्फोट घडवून आणण्यासाठी स्फोटके पुरवली असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
तीन संशयितांची चौकशीनंतर सुटका
एकूण आठ जणांकड हे स्फोट घडवून आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पाटणा रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहामध्ये दोघांनी बॉम्ब तयार केले होते. बॉम्ब तयार केल्यानंतर तिथून पळून जात असतानाच पोलिसांनी इम्तियाज याला अटक केली. पाटण्यातील स्फोटामागील संशयित हे झारखंडमधील असल्याचे तेथील अतिरिक्त महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितले.