सेल्फीच्या वेडाचे काय परिणाम भोगायला लागू शकतात याची कल्पनाच न केलेली बरी. सध्या बघावे तिथे अनेकजण सेल्फी काढताना दिसतात. विशेष म्हणजे कंपन्याही अशांसाठी दिवसागणिक नवनवीन मोबाईल बाजारात दाखलही करतात. सेल्फी काढणे हा आजार आहे असेही काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात नमूद करण्यात आले होते. सर्वच वयोगटात सध्या वाढत असलेल्या सेल्फी प्रेमामुळे एका मोराला आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये जलपैगुरी येथील एका मोरासोबत सेल्फी काढण्यासाठी तेथील गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. इतकेच नाही तर अनेकांनी त्याच्यासोबतचा सेल्फी चांगला यावा म्हणून त्याला विविध मार्गांनी त्रास दिला. यात काहींनी त्याचे पाय ओढले तर काहींनी पंख आणि पिसे ओढायलाही कमी केले नाही. त्यामुळे हा मोर आजारी पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

याबाबतचा तपास सुरु असल्याचे येथील पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हा मोर अचानक आजारी कसा पडला याबाबतचा तपास आम्ही करत आहोत असे वन्यजीव विभागाच्या वॉर्डन सीमा चौधरी यांनी सांगितले. अशाप्रकारे पक्षी आणि प्राण्यांच्या जवळ जाऊन सेल्फी काढणे त्या जीवांसाठी आणि मानवासाठीही धोक्याचे असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी जखमी झालेल्या एका अस्वलासोबत फोटो काढताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तसेच मोराचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी एका हत्तीसोबत सेल्फी काढताना हत्तीने व्यक्तीवर केलेल्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाला होता.