लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यातील मतदान १९ मे रोजी संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात ८ ते १० पैशांनी तर डिझेलच्या दरात १५-१६ पैशांनी वाढ झाली आहे.

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असल्याने इंधनाच्या दरांमुळे सरकारवर मतदारांचा रोष निर्माण होऊ नये, याची काळजी घेत केंद्र सरकारने सरकारी इंधन कंपन्यांना पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये विशेष फरक पडला नव्हता. उलट सातत्याने इंधनांच्या दरांमध्ये घट होत होती. मात्र, अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेचच झालेली ही दरवाढ नियमित स्वरुपाचीच दरवाढ असल्याचे इंधन कंपन्यांनी म्हटले आहे.

आजच्या झालेल्या इंधन दरवाढीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ७१.०३ वरुन ७१.१२ रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. तर, डिझेलचा दर ६५.९६ रुपयांवरुन ६६.११ रुपयांवर पोहोचला आहे. तसेच मुंबईत पेट्रोलच्या दरात ९ पैशांची वाढ झाली असून आजचा दर ७६.७३ रुपये इतका झाला आहे. तर डिझेलच्या दरात १६ पैशांनी वाढ झाली असून आजचा दर ६९.२७ रुपयांवर पोहोचला आहे.

सरकारी इंधन कंपन्यांवरील दर निश्चितीचे नियंत्रण केंद्र सरकारने हटवल्याने आता जागतीक बाजारातील इंधनांच्या किंमतींनुसार, देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज बदल होत आहेत. सध्या जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचा दर हा ७२.९८ डॉलर प्रति बॅरल इतका आहे.